अकोला महानगर पालिके अंतर्गत आकारण्यात येत असलेल्या घर टॅक्स वरील दंड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेनेचे मनपा गटनेते राजेश मिश्रा यांनी मनपा मधून सुरु असलेल्या ऑनलाईन सभेच्या ठिकाणी येऊन आयुक्तांकडे व महापौरांकडे हा घर टॅक्स चा दंड रद्द करण्याची मागणी केली.
यावर अकोला आयुक्त निमा अरोरा यांनी मागील सभेत या विषयावर निर्णय घेतला होता आणि ही मागणी एक महिन्यासाठी दिली होती. परंतु, आता त्यामध्ये मुदत वाढ करता येणार नाही आणि हा दंड रद्द करता येणार, असे राजेश मिश्रा व त्यांच्या सोबतच्या नगरसेवकांना सांगितले. त्यांच्या या विधानावर शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ऑनलाईन सभेसाठी सुरु असलेली उपकरणे बंद केली.
मात्र, बैठकीला उपस्थित असलेल्या पोलिसांनी नगरसेवकांना बैठकीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शिवसेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांना याचा विरोध केला. सरतेशेवटी महापौर आणि आयुक्तांनी नगरसेवकांना शांत राहण्यास सांगितले. मात्र, नगरसेवकांनी त्यांच्या अज्ञांचे पालन न केल्याने आणि गोंधळ कायम ठेवल्याने संतप्त महापौर अर्चना मसने यांनी शिवसेनेचे आठ नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे एक नगरसेवक असे एकूण नऊ जणांना सभेसाठी निलंबित केले.